मुंबई - कास्ट्राईब शिक्षक संघटना महाराष्ट्र राज्य राज्याध्यक्ष रवींद्र पालवे , सरचिटणीस आकाश तांबे, अति. सरचिटणीस तुषार आत्राम, विभागीय अध्यक्ष राजेंद्र वाघमारे, बाजीराव प्रज्ञावंत आदी प्रमुख पदाधिकाऱ्यांची शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्याशी विविध प्रश्नांवर बैठक संपन्न झाली. यामध्ये वेगवेगळ्या मुद्द्यांवर चर्चा करण्यात आली. पवित्र पोर्टल द्वारे राज्यातील शिक्षकांच्या 30,000 जागा भरण्याची कारवाई ताबडतोब करावी असे निवेदन देण्यात आले.संपादक : श्री. प्रमोद काकडे +91 9595 85 75 10
त्याचबरोबर सर्व कर्मचाऱ्यांचा जिव्हाळ्याचा असणारा महत्त्वाचा प्रश्न म्हणजे जुनी पेन्शन योजना राज्यातील सर्व शिक्षक व कर्मचाऱ्यांना लागू करण्यात यावी. राज्यातील मागासवर्गीय शिक्षकांचा भरतीतील अनुशेष दूर करण्याबाबत चर्चा झाली. तसेच राज्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या अनुदानित संस्थांनी आपले रोस्टर बिंदू नामावली नुसार अद्यावत करून मागासवर्गीय कक्षा कडून तपासून घ्यावी. विभागीय परीक्षेद्वारे केंद्रप्रमुख पदाची भरती होत असताना प्रत्येक जिल्हा परिषदेने आपले सामाजिक आरक्षण जाहीर करावे. राज्य शासनाच्या डीसीपीएस योजनेचा हिशोब देऊन केंद्र शासनाच्या एनपीएस योजनेची अंमलबजावणी करावी.
इतर कर्मचाऱ्यांप्रमाणे जिल्हा परिषद, महानगरपालिका, खाजगी अनुदानित शाळांतील पात्र शिक्षकांना 10, 20, 30 सुधारित आश्वासित प्रगती योजना लागू करावी. एक जानेवारी 2004 नंतर सेवेत आलेल्या शिक्षकांना वरिष्ठ वेतनश्रेणीत होणाऱ्या वेतन त्रुटीचे निराकरण बक्षी समितीचा खंड दोन प्रसिद्ध करून करण्यात यावा. वैद्यकीय उपचारासाठी शिक्षकांना कॅशलेस सुविधा उपलब्ध करण्यात यावी. तसेच विशेष शिक्षकांना 33%अट रद्द करून पदवीधर शिक्षकांना पदवीधर वेतनश्रेणी लागू करावी. केंद्रप्रमुखांची शंभर टक्के पदे शैक्षणिक व व्यावसायिक अर्हता विचारात घेऊन शिक्षकांमधूनच भरण्यात यावी. तसेच अनुसूचित जाती जमातीच्या मुलींसाठी स्वधार योजनेसाठी 150 कोटींची तरतूद करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली. खाजगी माध्यमिक शाळेत कार्यरत अर्धवेळ ग्रंथपालांची सेवा जेष्ठता यादी तयार करून त्यांची उन्नयन प्रक्रिया त्वरित राबविण्यात यावी. सर्व जिल्हा परिषदेच्या मुख्याध्यापकांना रजा रोखीकरणाचा लाभ देण्यात यावा. यासारख्या विविध प्रश्नांवर चर्चा करण्यात आली.
आजच्या या बैठकीत व्हिडिओ कॉन्फरन्स द्वारे महाराष्ट्र राज्याचे शिक्षण आयुक्त सुरज मांढरे, उपसचिव तुषार महाजन, सहसंचालक देविदास कुलाल, डॉ. श्रीराम पानझाडे सह संचालक शिक्षण आयुक्त कार्यालय, हे सर्व अधिकारी उपस्थित होते. वरील सर्व प्रश्नांवर चर्चा होवून सोडवण्याचे आश्वासन शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी शिष्टमंडळाला दिले. आजच्या या बैठकीसाठी शिक्षक संघटनेचे गौतम वर्धन, प्रशांत मोरे, किरण मानकर, स्वप्निल फुल माळी, संतोष आत्राम, सौ. वंदना भामरे, प्रभाकर पारवे, सिद्धार्थ भामरे, श्रीशैल कोरे, सोमलिंग कोळी, आदी पदाधिकारी राज्यभरातून मोठ्या संख्येने उपस्थित होते.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.