विवेक वार्ता सांगली-
निसर्ग कवी, ज्येष्ठ साहित्यिक ना. धो. महानोर यांचे सकाळी साडेआठ वाजता निधन झाले. पुण्यात वयाच्या 81 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. ते काही दिवस किडनीच्या आजाराने त्रस्त होते. पुण्यातील रुबी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. तसेच त्यांना काही दिवस व्हेंटिलेटर वर ठेवण्यात आले होते. या त्यांच्या निधनाने साहित्य कलाविश्वावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. ना. धो. महानोर यांचा जन्म 16 सप्टेंबर 1942 रोजी झाला. त्यांचे पूर्ण नाव नामदेव धोंडो महानोर पण त्यांना रानकवी या टोपण नावाने ओळखले जात असे.संपादक : श्री. प्रमोद काकडे +91 9595 85 75 10
त्यांचे लेखन हे निसर्गाशी नातं जोडणारे होते. त्यांच्या कवितेतून निसर्ग बोलायचा इतकं सुंदर त्यांच्या गीतांचे, कवितेचे बोल होते. सोबत त्यांनी मराठी चित्रपटासाठी ही गाणी लिहिली. 1995 साली त्यांनी अबोली या मराठी चित्रपटासाठी लिहिलेली गाणी विशेष लोकप्रिय ठरली. त्याच बरोबर एक होता विदूषक, जैत रे जैत, दोघी, मुक्ता, सर्जा, पुरुष, मालक, अजिंठा आणि यशवंतराव चव्हाण अशा काही चित्रपटांमधील गाण्यांचा यामध्ये उल्लेख करावा लागेल. या सर्वांमध्ये जैत रे जैत मधील मी रात टाकली, मी कात टाकली हे त्यांचं गीत खूप लोकप्रिय झाले.या शिवाय आम्ही ठाकर ठाकर, जांबुळ पिकल्या झाडाखाली, चिंब पावसानं रान झालं आबादानी यासारखी गीते खूप गाजली. रानातल्या कविता हा कवितासंग्रह विशेष गाजला. याशिवाय जगाला प्रेम अर्पावे,
पळसखेड ची गाणी, पावसाळी कविता, यासारखे कवितासंग्रह त्यांनी लिहिले. स्वतः शेतकरी असल्याने निसर्ग, शेती विषयी असलेले प्रेम त्यांच्या कवितेतून झळकते.
या नभाने या भुईला दान द्यावे आणि या मातीतून चैतन्य गावे, कोणती पुण्ये अशी येती फळाला जोंधळ्याला चांदणे लगडून जावे. अशी कामना करणारे रानकवी ना. धो. महानोर यांच्या निधनाने साहित्य, कला विश्वावर मोठा दुःखाचा डोंगर कोसळला आहे. या महान साहित्यकास भारत सरकारचा 1991 ला पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. 2015 मध्ये जीवनगौरव पुरस्कार, 1985 कृषी भूषण पुरस्कार, साहित्य अकादमी पुरस्कार, विंदा करंदीकर जीवनगौरव पुरस्कार अशा विविध पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. त्यांचा पार्थिव पळसखेड जि. औरंगाबाद या त्यांच्या गावी नेऊन अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. अशा या रानकवीला विवेक वार्ताच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली... विनम्र अभिवादन.....
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.