निश्चयाचा महामेरु, स्वराज्य संस्थापक, छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त ..
विवेक वार्ता - १९ फेब्रुबारी १६३० महाराष्ट्रातील मराठ्यांच्या राज्याचे संस्थापक आणि पहिले अभिषिक्त छत्रपती. त्यांचा जन्म मराठवाड्यातील भोसले या वतनदार घराण्यातील मालोजींचे पुत्र शहाजी आणि सिंदखेडकर जाधवराव यांच्या कन्या जिजाबाई या दांपत्यापोटी शिवनेरी किल्ल्यावर (जुन्नर तालुका – पुणे जिल्हा) झाला. त्यांच्या जन्म-तिथीविषयी एकमत नाही. मराठी बखरींच्या आधारावरून त्यांचा जन्म १६२७ मध्ये झाला; पण जेधे शकावली, कवींद्र परमानंद याचे शिवभारत आणि राजस्थानात उपलब्ध झालेल्या जन्मपत्रिका, या विश्वसनीय साधनांवरून फाल्गुन वद्य तृतीया, शके १५५१ म्हणजे १९ फेब्रुवारी १६३० ही तारीख बहुतेक इतिहाससंशोधकांनी आणि आता महाराष्ट्र शासनानेही निश्चित केली आहे.
शिवाजी महाराजांचे पूर्वज चितोडच्या सिसोदिया घराण्यातील होते, अशी लौकिक समजूत आहे. हे घराणे दक्षिणेतील होयसळ वंशातील आहे, असेही संशोधन पुढे आले आहे. मालोजी हे या घराण्यातील पहिले कर्तबगार पुरुष. त्यांना शहाजी व शरीफजी असे दोन मुलगे होते. मालोजी हे निजामशाहीतील एक कर्तबगार सरदार होते. मालोजी व त्यांचे बंधू विठोजी यांच्याकडे औरंगाबादजवळचे वेरुळ, कन्नड व देऱ्हाडी (देरडा) हे परगणे मुकासा (जहागीर) म्हणून होते. शहाजी पाच वर्षांचे असताना मालोजी मरण पावले. त्यांच्या नावाची जहागीर शहाजींच्या नावाने राहिली. निजामशाहीच्या दरबारातील खंडागळेच्या हत्तीच्या प्रकरणावरून शहाजी व लखूजी जाधव यांच्यात वितुष्ट आले, ते पुढे कायम राहिले. शहाजींनी १६२० पासून निजामशाहीच्या बाजूने आदिलशाहीविरुध्द लढण्यास सुरुवात केली होती; पण १६२४ मध्ये भातवडीच्या लढाईत पराक्रम करूनही त्यांचा सन्मान झाला नाही, म्हणून ते आदिलशाहीस मिळाले; पण इब्राहिम आदिलशहाच्या मृत्युनंतर ते पुन्हा निजामशाहीत आले.
निजामशाहीतील दरबारी कारस्थानात शहाजींचे सासरे लखूजी जाधव मारले गेले (१६२९). त्यामुळे नाराज होऊन त्यांनी निजामशाहीची नोकरी सोडली. त्या सुमारास त्यांचा मोठा मुलगा संभाजी यांचा विवाह शिवनेरीचा किल्लेदार विश्वासराव यांच्या मुलीशी झाला होता. त्या निमित्ताने शहाजींनी जिजाबाईस शिवनेरीवर ठेवले होते. विजापूर सोडून गेल्यामुळे मुहंमद आदिलशहा (कार. १६२७–५६) हा शहाजींवर रुष्ट झाला होता. आदिलशाही विरुध्द गेलेली आणि लखुजींच्या मृत्युमुळे निजामशाही सुटलेली अशा अवस्थेत शहाजींना परागंदा होण्याची वेळ आली. अखेर आदिलशहाच्या बोलावण्यावरून ते १६३६ मध्ये त्याच्या नोकरीत शिरले. आदिलशहाने त्यांच्याकडे पुण्याची जहागीर बहाल केली व मोठा हुद्दा देऊन कर्नाटकाच्या मोहिमेवर पाठविले. विजापूरच्या सैन्याने १६३८ च्या अखेरीस बंगलोर काबीज केले. तेव्हा बंगलोर, कोलार इ. प्रदेशांची जहागीर शहाजींना मिळाली आणि ते बंगलोर येथे कायमचे राहू लागले.
बालपण शिक्षण -
स्वराज्याचे तोरण, शिवाजी महाराजांचे बालपण शिवनेरी, माहुली (ठाणे जिल्हा) व पुणे येथे गेलेले दिसते. बंगलोरलाही ते काही काळ राहिले. शिवाजी आणि जिजाबाई यांच्याकडे महाराष्ट्रातील जहागिरीची व्यवस्था सोपवून शहाजीराजांनी त्यांची पुण्याला रवानगी केली. जहागिरीची प्रत्यक्ष व्यवस्था पाहण्यासाठी शहाजींनी दादोजी तथा दादाजी कोंडदेव आणि आपले काही विश्वासू सरदार यांची नेमणूक केली. जिजाबाईंचा देशाभिमान, करारीपणा आणि कठीण प्रसंगांतून निभाऊन जाण्यासाठी लागणारे धैर्य, या त्यांच्या गुणांच्या तालमीत शिवाजीराजे तयार झाले. त्यांच्या या शिकवणीतून शिवाजीराजांना स्वराज्यस्थापनेची स्फूर्ती मिळाली. आपल्या जहागिरीच्या संरक्षणासाठी गड, किल्ले आपल्या ताब्यात असले पाहिजेत, ही जाणीव त्यांना बालवयापासून झाली. त्यांनी गड आणि किल्ले आपल्या ताब्यात घेण्यासाठी अनेक मोहिमा आखून यशस्वी रीत्या पार पाडल्या. या कामात त्यांना आपल्या मातोश्रींचे आशीर्वाद होतेच.
शिवाजी महाराजांनी आपल्या उपक्रमाची सुरुवात सावधपणे केली. आपल्याशी सहमत होणारे समवयस्क तरुण त्यांनी जमविले आणि देशमुख, देशपांडे, वतनदार इत्यादींशी त्यांनी निरनिराळ्या प्रकारे संबंध जोडले. शिवाजी महाराजांना आठ पत्नी असल्याचे उल्लेख मिळतात. त्यांपैकी सईबाई (निंबाळकर) हिच्याशी त्यांचा प्रथम विवाह झाला. त्यानंतर सोयराबाई (मोहिते), पुतळाबाई (पालकर), सकवारबाई (गायकवाड), काशीबाई (जाधव) व सगुणाबाई (शिर्के) यांच्याशी त्यांचा विवाह झाला. यांशिवाय इंगळे व आणखी एका घरण्यातील मुलीबरोबरही त्यांचा विवाहसंबंध झाला. महाराजांना सईबाईपासून संभाजी (१६५७ –८९) व सोयराबाईपासून राजाराम (१६७०–१७००) असे दोन मुलगे झाले. याशिवाय त्यांना सहा कन्याही होत्या. सईबाई १६५९ मध्ये मरण पावल्या आणि काशीबाई राज्याभिषेकापूर्वी मरण पावल्या (१६७४). पुतळाबाई महाराजांबरोबर सती गेल्या. सोयराबाई संभाजींच्या कारकीर्दीत १६८१ मध्ये आणि सकवारबाई शाहूंच्या कारकीर्दीत मरण पावल्या. महाराजांनी पुण्याच्या परिसरातील मोकळ्या टेकड्या, पडके किल्ले, दुर्गम स्थळे हळूहळू आपल्या ताब्यात आणली. राजगड आणि तोरणा किल्ला (प्रचंडगड) महाराजांनी हस्तगत केला. भोरजवळ रोहिडेश्वरासमोर स्वराज्यनिष्ठेची शपथ घेतल्याची कथा ही याच सुमारास असावी. जी स्थळे आपण घेतली, ती विजापूर राज्यातील सुरक्षितता कायम रहावी या हेतूनेच, अशी भूमिका महाराजांनी घेतली. विजापूर दरबारनेही सुरुवातीस महाराजांच्या या चळवळीकडे फारसे लक्ष दिले नाही; पण महाराजांनी कोंडाण्याच्या (सिंहगडच्या) किल्लेदाराला आपलेसे करून तो आपल्या ताब्यात घेतला. त्यावेळी मुहंमद आदिलशहाचे डोळे उघडले. महाराजांच्या विरुध्द विजापूरचे सैन्य चालून गेले. दक्षिणेत विजापूरच्या सैन्यात शहाजीराजे हे अधिकारी म्हणून जिंजीच्या किल्ल्यासमोर तळ देऊन होते. त्यांच्यावर फितुरीचा आरोप ठेवण्यात येऊन त्यांना कैद करण्यात आले (१६४८) आणि त्यांना विजापूरला आणण्यात आले. या काळात पुरंदरच्या पायथ्याशी शिवाजी महाराजांनी निकराचा लढा देऊन विजापूरचे सैन्य उधळून लावले (१६४८ अखेर). सैन्याची इतर भागांतील आक्रमणेही परतवण्यात आली. शहाजी राजांना काय शिक्षा होईल, याची काळजी महाराज आणि जिजाबाई यांना पडली. त्यावेळी दक्षिणेचा मोगल सुभेदार म्हणून शाहजहानचा मुलगा मुरादबख्श हा औरंगाबाद येथे कारभार पहात होता. त्याच्याशी संपर्क साधण्याचा आणि त्याच्या मार्फत विजापूरवर दडपण आणण्याचा प्रयत्न महाराजांनी केला. कोंडाण्याचा किल्ला परत द्यावा, ही अट आदिलशहाने घातली. किल्ला परत देण्यास महाराज नाखूष होते; तथापि सोनोपंत डबीर याने शिवाजी महाराजांची समजूत घातली. सिंहगडचा किल्ला आदिलशहाकडे परत करण्यात आला. त्यानंतर शहाजींची सुटका होऊन (१६४९) त्यांची बंगलोरला सन्मानाने रवानगी करण्यात आली.
या मोहिमेत महाराजांच्या विरुध्द लढणाऱ्या विजापूरच्या सैन्यात फलटणकर, निंबाळकर, घाटगे, बल्लाळ हैबतराव ही मंडळी होती. त्यावेळी महाराजांच्या सैन्यात गोदाजी जगताप, भीमाजी वाघ, संभाजी काटे, शिवाजी इंगळे, भिकाजी चोर व त्याचा भाऊ भैरव चोर इ. निष्ठावान मंडळी होती. पुरंदरच्या पायथ्याशी झालेल्या लढाईत बाजी कान्होजी जेधे याने पराक्रमाची शर्थ केली; म्हणून शिवाजी महाराजांनी त्याला ‘सर्जेराव’ ही पदवी दिली. याच लढाईत मुसे खोऱ्याचा देशमुख बाजी पासलकर हा कामी आला. मावळातील वतनदार मंडळी ही महाराजांच्या कार्याकडे कशी ओढली जाऊ लागली, हे या मोहिमेवरून दिसून येते.
राज्यविस्तारपुढील सहा वर्षांत शिवाजी महाराजांनी जहागिरीचा सगळा बंदोबस्त आपल्याकडे घेतला. पुणे, सुपे, इंदापूर, चाकण ही या जहागिरीतील प्रमुख स्थळे. १६५४ च्या सुमारास महाराजांनी पुरंदरचा किल्ला महादजी नीळकंठराव किल्लेदार याच्या मुलांकडून हस्तगत केला आणि पुणे प्रांताची सुरक्षितता मजबूत केली.
पुढे महाराजांनी जावळीवर स्वारी केली. सहा महिन्यांच्या या मोहिमेत चंद्रराव मोरे आणि त्यांचे भाऊबंद मारले गेले आणि जावळीचा मुलूख त्यातील रायरीच्या किल्ल्यासकट महाराजांच्या ताब्यात आला (१६५६). विजापूरहून कोकणपट्टीकडे जाणाऱ्या मार्गावरील ही महत्त्वाची ठिकाणे. जावळी खोरे ताब्यात आल्याबरोबर महाराजांनी मोरो त्रिंबक पिंगळे यास प्रतापगड किल्ला बांधून घेण्यास आज्ञा दिली (१६५६).
“राष्ट्राचे संरक्षण दुर्गाकडून, राज्य गेले तरी दुर्ग आपल्याकडे असल्यास राज्य परत मिळविता येते, दुर्ग नसल्यास हातचे राज्य जाते, हे महाराजांचे धोरण. त्यांनी अनेक किल्ले बांधले, अनेकांची डागडुजी केली. प्रतापगडचा किल्ला म्हणजे कोकणच्या वाटेवरचा पहारेकरी. त्यामुळे आदिलशहाचे कोकणातील अधिकारी आणि लहानमोठे जमीनदार या सर्वांनाच मोठा शह बसला. तसेच विजापूरशी संपर्कही कमी होऊ लागला. पोर्तुगीज अंमलाखाली असलेला ठाणे, वसई हा भाग वगळता जव्हारपासून गोव्यापर्यंतचा बहुतेक कोकण प्रदेश विजापूरच्या आदिलशाहीकडे होता.
मुहंमद आदिलशहाच्या मृत्युनंतर (४ नोव्हेंबर १६५६) त्याचा मुलगा दुसरा अली आदिलशहा गादीवर आला. तो औरस पुत्र नाही किंवा त्याचे कुल अज्ञात आहे, अशी सबब पुढे करून मोगलांच्या सैन्याने विजापूरच्या ईशान्येकडील कल्याणी आणि बीदर ही स्थळे काबीज केली (१६५७). शिवाजी महाराजांनीही मोगलांचे जुन्नर शहर लुटले आणि अहमदनगरच्या पेठेवर हल्ला केला. ही धावपळीची लढाई चालू असतानाच महाराजांनी औरंगजेबाशी संपर्क ठेवला होता. विजापुरातील बदलती परिस्थिती लक्षात घेऊन कोकणात आपल्या पदरात काय पडेल, ते मोगलांकडून मिळवावे, असा विचार महाराजांनी केला होता. विजापूरशी लवकर तह करावा, अशी मोगल बादशहा शाहजहानने आज्ञा केली. या सुमारास शाहजहान हा अतिशय आजारी पडला (१६५७). हे वृत्त विजापूरलाही कळले होते. त्यामुळे विजापूरने हा तह संपूर्णपणे पाळण्यास टाळाटाळ केली. शाहजहानचा आजार आणि औरंगजेबाचे उत्तरेकडे लागलेले लक्ष, हे पाहून महाराजांनी सरळ कल्याण व भिवंडी ही स्थळे हस्तगत केली (२४ ऑक्टोबर १६५७).
पुढे १६५८ मध्ये माहुलीचा किल्लाही काबीज केला. नंतर औरंगजेबाकडे आपला दूत पाठवून त्याच्याशी सलोख्याचे बोलणे सुरू केले. फेब्रुवारी १६५८ मध्ये औरंगजेब औरंगाबादेहून आगऱ्याकडे जाण्यास निघाला आणि २१ जुलै १६५८ मध्ये तो दिल्लीच्या तख्तावर बसला.
अफझलखान-शिवाजी भेट व प्रतापगडचे युद्ध
याच सुमारास, आम्हाला परत केलेल्या कल्याण, भिवंडी आणि पुणे प्रांतातून शिवाजीला हाकलून लावा, असे दडपण मोगलांकडून विजापूरवर येऊ लागले. विजापूर दरबारने शिवाजी महाराजांविरुध्द अफझलखानाची रवानगी केली. इ.स. १६४९ पासून वाई परगणा अफझलखानाकडे मुकासा (जहागीर) म्हणून होता. त्यामुळे त्याला या प्रदेशाची माहिती होती. अफझलखान हा विजापूरहून एप्रिल १६५९ मध्ये निघाला आणि वाईस पोहोचला. वाटेत त्याने पंढरपूर येथे अत्याचार केले, अशा कथा पुढे प्रचारात आल्या. पंढरपूला त्याने जबर रकमा वसूल केल्या असाव्यात आणि धमकी व दहशतीचे वातावरण पसरून दिले असावे. यापूर्वी केव्हा तरी त्याने अशाच प्रकारे उपद्रव तुळजापूर येथेही दिला होता. बजाजी निंबाळकराची कैद आणि जबर दंड ही प्रकरणे याच काळातील होत.
विजापूरच्या सैन्यात पांढरे, खराटे, जाधव इ. मराठे सरदार होते. वाईला आल्यानंतर अफझलखानाने पुणे, कल्याण आणि भिवंडी प्रांतांचा ताबा घेण्यासाठी वरील मराठी सरदार आणि सिद्दी हिलाल यांना त्या प्रांतांत पाठवून दिले. त्या प्रांतांतील मराठे वतनदार, देशमुख, देशपांडे इत्यादींना महाराजांच्या विरुध्द उठविण्याचाही अफझलखानाने प्रयत्न केला.
महाराज या अडचणीत असतानाच सईबाई वारल्या (१६५९); तथापि ते विचलित झाले नाहीत. अफझलखानाच्या सैनिकी बलाची व कर्तृत्वाची त्यांना कल्पना होती. शिवाजीला कैद करावे किंवा जमल्यास ठार मारावे, असा आदेश घेऊनच अफझलखान हा विजापूरहून आला आहे, हेही त्यांना माहीत होते. हे लक्षात ठेवूनच त्यांनी आपला तळ प्रतापगडसारख्या दुर्गम स्थळी ठेवला आणि अफझलखानाचा प्रतिकार करण्याची भक्कम तयारी केली.
अफझलखानाचे बरेच सैन्य पुणे, कल्याण व भिवंडी प्रांतांत पसरले होते. त्यामुळे त्याच्या सैन्याची साहजिकच विभागणी झाली. वाईला आपल्याजवळ असलेले सैन्य पुरे पडेल, याची त्याला खात्री वाटत नसावी. प्रतापगडसारख्या तळावर जाऊन लढा द्यावा, तर तो यशस्वी होईल किंवा नाही आणि ही मोहीम लवकर आटोपेल की नाही, याची त्याला खात्री वाटेना; म्हणून त्याने महाराजांच्याकडे निर्वाणीचा खलिता पाठवून त्यांच्यावर दडपण आणण्याचे प्रयत्न केले.
अफझलखानाने पाठविलेले पत्र आणि त्याला महाराजांनी दिलेले उत्तर ही दोन्ही कवींद्र परमानंदाने आपल्याशिवभारत काव्यात संस्कृतमध्ये अनुवाद करून दिली आहेत. पत्रांवरून विजापूरचे शासन हे मोगलांच्या आदेशाप्रमाणे वागत असावे, याबद्दल संशय रहात नाही. अफझलखानाने महाराजांना कळविले.
महाराजांनी खानाला प्रतापगडाकडे आणण्यासाठी मोठ्या मुत्सद्दीपणाने त्याला कळविले, की “आपण प्रतापी, आपला पराक्रम थोर, आपण माझ्या वडिलांचे ऋणानुबंधी; त्यामुळे आपणही माझे हितचिंतक आहात. आपल्या तळावर येऊन आपल्याला भेटणे हे सध्याच्या वातावरणात मला सुरक्षितपणाचे वाटत नाही. उलट आपण प्रतापगडास यावे. माझा पाहुणचार स्वीकारावा. मी आपले सर्व काही, माझा खंजीरसुद्धा आपल्यापाशी ठेवून देईन.”
महाराजांचा हा डावपेच अफझलखानाला कळला नाही. युद्धावाचूनच शिवाजी आपल्या हातात येणार, या भ्रमात तो राहिला. प्रत्यक्षात महाराजांना कैद करून अगर ठार मारून ही मोहीम निकालात काढावी, असा त्याचा हेतू होता. महाराजांनी सैन्याची मोठी तयारी केली होती.
घोडदळ अधिकारी नेताजी पालकर आणि पायदळ अधिकारी मोरोपंत पिंगळे हे जय्यत तयारीनिशी येऊन महाराजांना मिळाले. प्रतापगडाभोवतालच्या डोंगरांत मराठ्यांची पथके ठिकठिकाणी मोक्यावर ठेवण्यात आली. वाईहून प्रतापगडकडे जाताना महाराजांनी अफझलखान आणि त्याचा सरंजाम यांची मोठी बडदास्त राखली. अफझलखानाने जड सामान वाईला ठेवले होते. प्रतापगडाजवळ येऊन पोहोचल्यावर भेटीबाबत वाटाघाटी झाल्या आणि प्रतागडाजवळ ठरलेल्या स्थळी शामियाने उभारून उभयतांच्या
भेटी व्हाव्यात असे ठरले. दोघांनीही बरोबर दहा शरीररक्षक आणावेत, त्यांना शामियानाच्या बाहेर ठेवावे, प्रत्यक्ष शामियान्यात दोघांचे वकील आणि दोन रक्षक असावेत असा करार झाला. भेटीपूर्वी भेट अयशस्वी झाली, तर काय करावे यासंबंधी शिवाजी महाराजांनी सर्वांना योग्य त्या सूचना दिल्या होत्या.
१० नोव्हेंबर १६५९ रोजी शिवाजी महाराज आणि अफझलखान यांची भेट झाली. महाराजांच्या शरीरक्षकांत गायकवाड, सिद्दी इब्राहीम, जिवाजी महाले (सकपाळ) इ. मंडळी होती, तर अफझलखानाच्या शरीररक्षकांत सय्यद बंडा, शंकराजी मोहिते, पिलाजी मोहिते इ. मंडळी होती. महाराजांचा वकील पंताजी गोपीनाथ तर खानातर्फे कृष्णाजी भास्कर हेही बरोबर होते. भेटीपूर्वी दोघांनीही आपल्या तलवारी रक्षकांच्या हाती दिल्या होत्या. दोघांपाशी खंजीरी होत्या. अफझलखानाने शिवाजी महाराजांना घट्ट आलिंगन दिले. शत्रू हाती आला आहे, त्याचा निकाल लावावा असे खानाला वाटले असावे. त्याक्षणी महाराजांनी वाघनख त्याच्या पोटात खुपसले आणि त्याच्या मिठीतून सुटका करून घेतली आणि नंतर कट्यारीने वार केला.
या भेटीत अफझलखान मारला गेला आणि त्याच्या शरीररक्षकांनी केलेला प्रतिकारही महाराजांच्या शरीररक्षकांनी मोडून काढला. भेटीपूर्वी ठरल्याप्रमाणे महाराजांनी पुढील हालचालींसाठी सैन्याला इशारा दिला. त्यांनी अफझलखाच्या बेसावध सैन्यावर चाल केली. त्यावेळी झालेल्या युद्धात खानाच्या सैन्याची लांडगेतोड झाली. महाराजांना या युद्धात हत्ती, घोडे, उंट, मूल्यवान वस्त्रे, अलंकार इ. संपत्तीची मोठी लूट प्राप्त झाली. अफझलखानाचे बरेच अधिकारी कैद झाले. काहीजण पळून गेले.
प्रतापगडच्या युद्धात लष्करी डावपेच, सैन्याची हालचाल आणि व्यूहरचना तसेच अनुकूल रणांगणाची निवड आणि प्रसंगावधान हे शिवाजी महाराजांच्या युद्धकौशल्याचे महत्त्वाचे विशेष आढळतात. या प्रसंगी महाराजांचे धैर्य, सावधानपणा आणि धाडस हे गुण प्रकर्षाने प्रत्ययास आले. अफझलखानाचा वध ही महाराजांच्या शौर्यसाहसाची गाथा आहे; पण खानाच्या सैन्याचा धुव्वा उडविणे, हा त्यांच्या रणनीतीचा असामान्य विजय होय. अफझलखानाच्या मृत्यूने सगळा दक्षिण भारत हादरून गेला.
पन्हाळ्याचा वेढा व शायिस्तेखानाशी संग्राम
अफझलखानाच्या मृत्यूनंतर विजापूर राज्यात उडालेल्या गोंधळाचा महाराजांनी पुरेपूर फायदा घेतला. त्यांच्या सैन्याच्या एका तुकडीने कोकणात राजापूर, वेंगुर्ल्यापर्यंत धडक मारली, तर दुसऱ्या तुकडीने घाटावर कोल्हापुरापर्यंत आक्रमण केले. नोव्हेंबर १६५९ च्या अखेरीस पन्हाळगडचा दुर्गम किल्ला महाराजांच्या हातात आला. अशा परिस्थितीत विजापूर दरबार स्वस्थ बसून राहणे शक्य नव्हते. पन्हाळगड परत जिंकून घेण्याच्या उद्देशाने सिद्दी जौहरच्या नेतृत्वाखाली विजापूरहून प्रबळ सैन्य चालून आले आणि त्याने पन्हाळागडाला वेढा घातला. यावेळी आदिलशहाने मोगलांची मदत मागितली. शायिस्तेखान हा जानेवारी १६६० मध्ये औरंगाबादेस पोहचला.
शायिस्तेखानाच्या पत्रांवरून मोगल आणि विजापूर हे दोघे परस्परांशी किती एकमताने वागत होते, याची कल्पना येते. त्याच सुमारास शायिस्तेखान हा मोठ्या सैन्यानिशी औरंगाबादेहून कूच करून निघाला. अहमदनगर, सुपे या मार्गाने तो ९ मे १६६० रोजी पुण्यात दाखल झाला. शिवाजीचे पारिपत्य करून त्याच्या मुलखातील किल्ले घेऊन या भागास बंडातून मुक्त करावे, अशी औरंगजेबाची आज्ञा होती. म्हणून शायिस्तेखानाने पुण्यातच तळ ठोकला. पुढील तीन वर्षे तो औरंगाबादेच्या ऐवजी पुण्याहूनच सुभ्याचा कारभार पाहत होता. इकडे महाराज पन्हाळ्यात राहून वेढा लढवीत असता शायिस्तेखानाने उत्तरेकडे कूच करून चाकणच्या गढीला वेढा घातला. मराठे मोगलांशी निकराने लढत होते. किल्लेदार फिरंगोजी नरसाळे याने चाकणचा किल्ला शर्थीने लढविला.
तीन महिन्यांच्या या वेढ्यात मोगलांचे सहाशेच्यावर सैनिक जखमी वा मृत झाले. शेवटी तो किल्ला मोगलांच्या ताब्यात आला. मराठ्यांना मोगल आणि आदिलशहा या दोन शत्रूंशी एकाच वेळी लढावे लागत आहे, हे ओळखून शिवाजी महाराजांनी सिद्दी जौहरशी वरपांगी सलोख्याचे बोलणे करून मोजक्या लोकांनिशी रात्री पन्हाळगड सोडला (१३ जुलै १६६०) आणि विशाळगडाकडे कूच केले. विजापूरच्या सैन्याने त्यांचा पाठलाग केला. त्यावेळी गजापूरच्या खिंडीत सैन्याचा निकराने प्रतिकार करीत असता बाजीप्रभू देशपांडे हा जखमी होऊन मरण पावला. महाराज विशाळगडास पोहचले आणि तेथून राजगडास गेले. सिद्दी जौहरने शिवाजी महाराजांना पन्हाळगडातून जाऊ दिले, असा संशय अली आदिलशहाला आला. आपल्यावर हा नाहक ठपका ठेवण्यात आला, याचे वैषम्य वाटून सिद्दी जौहरने अली आदिलशहाच्या विरुद्ध बंड केले. अली आदिलशहाच्या वतीने जौहरने पन्हाळागडाला वेढा घातला, तेव्हा महाराजांनी पन्हाळगड मुत्सद्देगिरीने सोडून दिला.
चाकणच्या वेढ्यात आपली मोठी हानी झाली, हे पाहून शायिस्तेखानाने महाराजांच्या किल्ल्यांवर हल्ले करण्याचा नाद सोडला. मोगल मैदानी प्रदेशात दहशत निर्माण करीत होते; पण त्यांना शिवाजी महाराजांच्या ताब्यातील किल्ले घेता आले नाहीत. मोगलांनी १६६१ च्या प्रारंभी लोणावळ्याजवळून कोकणात प्रवेश करण्याचा प्रयत्न केला; पण मोगल सेनापती कारतलबखान यास उंबरखिंडीत गाठून महाराजांनी त्याला शरण येण्यास भाग पाडले.
उंबरखिंडीचे युद्ध (१६६१) हे शिवाजी महाराजांच्या गनिमी युद्धतंत्राचे एक वैशिष्ट्यपूर्ण उदाहरण होय.नंतर मोगल आणि मराठे यांच्यात किरकोळ चकमकी झाल्या. शायिस्तेखान पुण्यास मोठे सैन्य घेऊन ठाण मांडून बसलेला होता. अखेर शिवाजी महाराजांनी शायिस्तेखानाचा समाचार घेण्याची एक धाडसी योजना आखली. ही योजना म्हणजे मोठ्या सैन्याने वेढलेल्या व शायिस्तेखान असलेल्या पुण्यातील लाल महालावर हल्ला करणे, ही होय. शायिस्तेखानाचा दुय्यम सेनापती जोधपूरचा राजा जसवंतसिंह हा होता. ५ एप्रिल १६६३ च्या रात्री महाराज निवडक सशस्त्र सहकाऱ्यांसह शायिस्तेखानाच्या लष्करात घुसले, किरकोळ चकमकीनंतर त्यांनी शायिस्तेखानाला महालात गाठले. शायिस्तेखान पळून जाण्याचा प्रयत्नात असता, त्याच्यावर तीक्ष्ण शस्त्राचे वार होऊन त्याला आपली बोटे गमवावी लागली. त्याचा एक मुलगा या हल्ल्यात ठार झाला. महाराज आणि त्यांचे सहकारी सुखरूपपणे सिंहगडाकडे निघून गेले.
शायिस्तेखानाच्या महालातील चाळीस-पन्नास स्त्री-पुरुष ठार अगर जखमी झाले होते. मोगलांच्या छावणीत एकच हाहाःकार उडाला.
औरंगजेब त्यावेळी काश्मीरच्या दौऱ्यावर होता. त्याने शायिस्तेखानाला ताबडतोब बंगालच्या सुभ्यावर पाठविले आणि त्या जागी मोठा मुलगा मुअज्जम यास नेमले.
सुरतेची लूट
शिवाजी महाराजांच्या अंमलाखाली सामान्यपणे पुणे जिल्हा, मध्य आणि दक्षिण कोकण आणि सातारा जिल्ह्यातील जावळी तालुका व प्रतापगड हे प्रदेश होते. मोगल महाराष्ट्रात सर्वत्र पसरलेले होते. त्यांना जबर धक्का द्यावा म्हणून शिवाजी महाराजांनी आणखी एक सुरत लुटीचा धाडसी उपक्रम योजला. त्याकाळी सुरत मोगल साम्राज्याचे महत्त्वाचे बंदर होते. मोगलांचा व्यापार प्रामुख्याने याच बंदरातून चाले. यूरोपीय तसेच इराणी, तुर्की व अरब यांच्या जहाजांची तेथे नेहमीच वर्दळ असे. मध्य आशियातून मक्केच्या यात्रेला जाणारे यात्रेकरू याच बंदरातून पुढे जात. सुरतेस लक्षाधीश धनिकांच्या मोठमोठ्या पेढ्या होत्या. महाराजांनी कल्याण, भिवंडी, डांग या भागांतून पोर्तुगीज हद्दीच्या बाजू-बाजूने सरकत सुरत गाठले. मराठे सुरतेच्या अगदी जवळ येईपर्यंत मोगल अधिकाऱ्याना त्यांचा पत्ता लागला नाही, हल्ला होताच तेथील मोगल अधिकारी किल्ल्यात जाऊन बसला, तो शेवटपर्यंत बाहेर आलाच नाही.
चार दिवस मराठ्यांनी सुरतेची लूट केली (६ ते ९ जानेवारी १६६४). मोगलांचा सगळा प्रतिकार त्यांनी हाणून पाडला. इंग्रज, डच इ. यूरोपीय व्यापाऱ्यांनी आपापल्या वखारींचे संरक्षण करण्याच प्रयत्न केला. मराठे त्यांच्या वाटेला गेले नाहीत. सुरतेच्या लुटीतील हाती सापडलेली संपत्ती रोकड, सोने, चांदी, मोती, रत्ने, वस्त्रे इ. मिळून एक कोटीच्या आसपास होती. अहमदाबाद आणि मोगल राज्यांतील इतर भागांतून सैन्य चालून येत आहे, अशी वार्ता लागताच महाराजांनी सुरत सोडले आणि संपत्ती घेऊन ते सुरक्षितपणे स्वराज्यात परतले.
या स्वारीनंतर शहाजीराजे कर्नाटकात घोड्यावरून पडून होदिगेरे येथे २३ जानेवारी १६६४ रोजी मरण पावले.
महाराजांच्या सुरतेवरील या स्वारीचे तपशीलवार वर्णन यूरोपीय वखारवाल्यांच्या कागदपत्रांतून आढळते. या हल्ल्यामुळे शिवाजी महाराजांचे नाव परदेशातही चर्चिले जाऊ लागले. सुरतेहून आणलेल्या लुटीतून त्यांनी दक्षिण कोकणातील सिंधूदुर्ग बांधला आणि मराठा आरमाराचा विस्तार केला. याची सुरवात त्यांनी कल्याण-भिवंडी घेऊन यापूर्वीच सुरू केली होती (१६५७). पश्चिम किनाऱ्याचे रक्षण आणि आरमाराला सुरक्षितता या हेतूने शिवाजी महाराजांनी ठिकठिकाणी जलदुर्ग बांधले. यूरोपीयांच्या राजकीय डावपेचावर महाराजांचे सतत लक्ष असे. जंजिऱ्याच्या सिद्दीला इंग्रज आणि पोर्तुगीज मदत करतात, हे ते जाणून होते. इंग्रजांनी पन्हाळ्याच्या वेढ्यात (१६६०) सिद्दी जौहरला दारुगोळ्याची मदत केली होती. याबद्दल शिक्षा म्हणून महाराजांनी इंग्रजांच्या वखारीवर हल्ला करून त्यांचे काही अधिकारीही कैद केले होते.
इंग्रजांनी मोठे प्रयत्न करून त्यांची सोडवणूक केली; तेव्हा आदिलशहाने दक्षिण कोकण घेण्यासाठी अझीझखानाच्या नेतृत्वाखाली मोठे सैन्य पाठवले. अझीझखान आणि वाडीचे सावंत एक झाले, परंतु अझीझखान मरण पावल्यामुळे (१० जुलै १६६४) आदिलशहाने खवासखान याला पाठविले. तेव्हा महाराजांनी वेंगुर्ल्यावर हल्ला केला आणि कुडाळ येथे ते खवासखानावर चालून गेले (ऑक्टोबर १६६४). खवासखानाने निकराने प्रतिकार केला आणि विजापूरकडे तातडीची मदत मागितली. ती मदत घेऊन मुधोळचा बाजी घोरपडे येत असता मराठ्यांनी त्याला गाठले. या लढाईत बाजी घोरपडे जखमी झाला आणि पुढे लवकरच मरण पावला. त्याजकडील खजिना मराठ्यांनी लुटला.
जयसिंहाचा दुय्यम सेनापती दिलेरखान याने पुरंदरला वेढा घातला. जयसिंहाने आदिलशहा, पोर्तुगीज आणि लहानमोठे जमीनदार यांना शिवाजीला मदत करू नये असे बजावले. आदिलशाहीतील अनेक सरंजामदार त्याने आपल्याकडे ओढले. दहा ते पंधरा हजार सैनिकांच्या स्वतंत्र तुकड्या करून त्यांनी शिवाजीचा प्रदेश उद्ध्वस्त करावा, अशा आज्ञा दिल्या. त्यामुळे प्रजा हैराण होऊन गावे सोडून कोकणात आणि अन्यत्र जाऊ लागली. महाराजांनी जयसिंहाशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला; पण शरणागती पत्करल्याशिवाय बोलणे नाही, ही भूमिका त्याने घेतली.
मोगलांनी निकराचा हल्ला करून पुरंदरजवळचा रुद्रमाळचा किल्ला ताब्यात घेतला (१४ एप्रिल १६६५). तो जाऊ देऊ नये आणि पुरंदर हाती यावा अशी त्यांची योजना होती. दिलेरखान सासवड येथे ठाण मांडून राहिला. मोगलांनी बुरुजांच्या उंचीचे दमदमे तयार केले (३० मे १६६५). त्यांवर तोफा चढवून किल्ल्यावर मारा करण्याचा त्यांचा हेतू होता. मराठे व मोगल यांच्या रोज चकमकी झडत. महाराजांनी किल्ल्यात मदत पाठविण्याचे प्रयत्न केले; पण ते पुरंदरच्या शिबंदीला कमी पडत होते. मोगल शेवटी पुरंदर घेणार अशी चिन्हे दिसू लागली. शिवाय जयसिंहाने प्रबळ लष्करी पथके मराठ्यांच्या मुलखात पाठवून तो बेचिराख करण्याचे सत्र सुरू केले. पुरंदरच्या युद्धात मुरारबाजी देशपांडेसारखा पराक्रमी सेनापती कामी आला. तेव्हा शिवाजी महाराजांनी एकदंर परिस्थितीचा विचार करून शेवटी चाणाक्षपणे व दूरदृष्टीने तह करण्याचे ठरविले. त्यांचा हेतू राज्य आणि शक्य तितके किल्ले वाचवावे, हा होता. ११ जून १६६५ रोजी शिवाजी महाराजांनी जयसिंहाची भेट घेतली. संपूर्ण शरणागती पत्करून मिळेल त्यावर समाधान मानावे, ही जयसिंहाची मागणी. कोणत्याही परिस्थितीत युद्ध थांबवावे, हा महाराजांचा हेतू. अखेर पुरंदरच्या तहाच्या वाटाघाटी होऊन अटी ठरल्या. त्या मोबदल्यात घाटावरचे विजापूरचे पाच लाख होनाचे प्रांत शिवाजींनी जिंकून घ्यावेत आणि कोकणातील मुलूख सांभाळावेत व त्या मोबदल्यात वर्षाला तीन लाख होन या हिशोबाने चाळीस लाख होनाच्या खंडणीचा बादशाही खजिन्यात भरणा करावा. आदिलशहाचा कोकणातील मुलूख आपल्या ताब्यात आहे. त्याचे उत्पन्न चार लाख होनाचे आहे, असे महाराजांनी कळविले.
शिवाजी महाराजांनी मोठय़ा नाखुशीने हा तह स्वीकारला. शिवाजींचा संपूर्ण कोंडमारा केला, तर ते विजापूरशी हातमिळवणी करतील, हा धोका जयसिंहाला दिसत होता. घाटावरचा मुलूख आम्ही तुम्हाला देऊ, अशी बोलणी विजापूरने शिवाजी महाराजांशी सुरू केली होती. म्हणून जयसिंहाने शिवाजी महाराजांना १२ किल्ले आणि आदिलशाही मुलूखाचे आश्वासन देऊन त्यांना गुंतवून ठेवले.
तहातील अटींनुसार मोगलांनी पुणे, कल्याण आणि भिवंडी हे प्रांत शिवाजी महाराजांकडून घेतले. त्याचे महाराजांना मनस्वी दुःख झाले; पण कोकणातील आणि घाटावरील काही किल्ले व प्रदेश महाराजांनी टिकवून ठेवण्यात यश मिळविले.
औरंगजेबाने विजापूरही जिंकून घ्यावे, अशी जयसिंहाला आज्ञा केली. शिवाजी महाराजांना बरोबर घेऊन तो विजापूरवर चालून गेला. मातब्बर प्रधान मुल्ला अहमद हा मोगलांकडे गेला असतानाही विजापूरकरांनी लढण्याची शर्थ केली (जानेवारी १६६६). निकराच्या लढायांत जयसिंहाला माघार घ्यावी लागली आणि भीमा ओलांडून सोलापूर गाठावे लागले.
या मोहिमेत शिवाजी महाराजांना कपटकारस्थानाने ठार मारण्याचा बेत दिलेरखानाने जयसिंहाला सांगितला, असे जयसिंहाच्या छावणीतील इटालियन प्रवासी निकोलाव मनुची (१६३९–१७१७) म्हणतो. तेव्हा जयसिंहाने ही सूचना फेटाळली आणि शिवाजी महाराजांनी पन्हाळगडावर हल्ला करावा असे सुचवले. नेताजी पालकर वेळेवर न आल्यामुळे महाराजांचा हा हल्ला अयशस्वी झाला (१६ जानेवारी १६६६). शिवाजी महाराजांच्या नाराजीमुळे नेताजी प्रथम विजापूरला मिळाला.
जंजिऱ्याचे सिद्दी हे मूळचे विजापूरचे चाकर; पण जयसिंहाने त्यांना १६६५ नंतर मोगलांच्या आश्रयाखाली आणले. कोकणातील आपल्या अधिकारावर ही आक्रमण आहे, असे शिवाजी महाराजांना वाटू लागले. शिवाय विजापूरच्या मोहिमेत जयसिंहाची फजिती झाली होती. तेव्हा शिवाजी महाराज विजापूरशी युती करतील, अशी शंका जयसिंहाला आली. शिवाजीला औरंगजेबाने आग्र्यास बोलावून घ्यावे, असे त्याने बादशहास सुचविले. त्याप्रमाणे औरंगजेबाचा हुकूम आला. आग्र्याला जाण्यास ते राजी नव्हते; पण जयसिंहाने त्यांची समजूत घातली आणि पुरंदरच्या तहातील काही अटी सैल होऊ शकतील, असे सूचित केले. शिवाय मुलगा रामसिंह तुमच्या सुरक्षिततेची आग्र्यामध्ये पूर्ण काळजी घेईल, अशीही हमी जयसिंहाने दिली. आग्र्याला जाऊन बादशाहाची भेट घ्यावी, असे महाराजांनी ठरविले. मोजका सरंजाम आणि संभाजी यास घेऊन महाराज आग्र्यास जाण्यास निघाले (५ मार्च १६६६).
आग्राची भेट व सुटका
महाराज १२ मे १६६६ रोजी दुपारी आग्ऱ्यास पोहोचले. रामसिंहाने त्यांचे स्वागत केले. रामसिंहाचा तळ त्यावेळी खोजा फिरोजखान याची कबर असलेल्या बागेत होता. ही जागा ग्वाल्हेर-आग्रा रस्त्यावर आग्ऱ्याच्या किल्ल्यापासून सु. अडीच किमी. अंतरावर आहे. रामसिंहाने आपल्या तळाशेजारीच त्यांना राहण्यास जागा दिली. महाराज पोहोचताच त्यांना आपल्या भेटीस आणावे, अशी औरंगजेबाने आज्ञा केली होती. त्यावेळी बादशहाच्या वाढदिवसानिमित्त भरविलेला दरबार संपला होता व औरंगजेब मोजक्या अधिकाऱ्यांसह दिवाण-इ-खासमध्ये बसला होता. या ठिकाणी रामसिंह शिवाजी महाराजांसह गेला.
महाराज आणि संभाजी यांनी दरबारी पध्दतीप्रमाणे मोहरा आणि रुपये नजर केले. औरंगजेब स्वागताचा एकही शब्द बोलला नाही. त्यांना दरबारी अधिकाऱ्याच्या रांगेत अयोग्य जागी उभे करण्यात आले. आपला अपमान झाला, ह्या विचाराने शिवाजी महाराजांचा क्षोभ अनावर झाला.
औरंगजेबाच्या आज्ञेने महाराजांच्या तळाभोवती चौकी पहारे बसविण्यात आले. आपल्यावर विश्वास ठेवून महाराज आग्र्याला आले, याची रामसिंहाला जाणीव होती. त्याने आपण महाराजांच्याबद्दल जबाबदार राहू, अशा प्रकारचा जामीन बादशहाला लिहून दिला. त्यामुळे महाराजांना रामसिंहाच्या तळावरून हलविण्यात आले नाही.
पुढील तीन महिने महाराजांचे वास्तव्य आग्र्यात होते. हा त्यांच्या जीवनमरणाचा प्रसंग होता, असेच म्हणावे लागेल. औरंगजेबाने दगाफटका करावा, ठार मारावे वगैरे विचार व्यक्त केले; पण प्रत्येक वेळी अनपेक्षित घडत गेले आणि शिवाजी महाराजांवरील संकट टळत गेले. महाराजांना दगाफटका झाला, तर बादशहाच्या वचनावर इतःपर कोणाचाही विश्वास रहाणार नाही, असाही विचार औरंगजेबाची मोठे बहीण जहांआरा हिने बोलून दाखविला. महाराजांनीही मोगल वजीर जाफरखान, बख्शी मुहम्मद अमीन इत्यादींशी संपर्क साधून आपल्यावर एकाएकी प्राणसंकट येणार नाही, याबद्दल कसोशीने प्रयत्न केले.
आपल्या ताब्यात असलेले किल्ले आणि मुलूख महाराजांनी मोगलांना देऊन टाकावेत म्हणजे त्यांना इतरत्र मनसबी देण्यात येतील, हे औरंगजेबाचे धोरण होते. जयसिंहाने केलेल्या तहाने त्याचे समाधान झाले नव्हते. कुणीकडून का होईना, पण महाराजांना महाराष्ट्रातून बाहेर काढावे हा त्याचा हट्ट. उलट, “मी भक्कम रक्कम देतो, माझे किल्ले परत करा” असे महाराजांचे म्हणणे. महाराजांना आग्र्यासच काही दिवस ठेवावे ही जयसिंहाची इच्छा; पण त्यांच्या जीवास अपाय होऊ नये याची त्याला काळजी. आग्र्याच्या वास्तव्यात मोगल दरबारातील अधिकाऱ्यांना आपल्याकडे वळविण्यात महाराजांनी पाण्यासारखा पैसा खर्च केला. महाराजांच्या बाणेदार वर्तनामुळे मोगल प्रजा स्तिमित झाली होती.
विजापूरच्या मोहिमेत जयसिंहाची नामुष्की झाली होती. इराणचा बादशहा भारतावर हल्ला करणार, अशी अफवा होती आणि महाराजांचा प्रश्न अद्यापि निकालात निघाला नव्हता. या परिस्थितीत औरंगजेब मोठ्या काळजीत होता. शिवाजी महाराजांकडून आपल्या मागण्या मान्य होत नाहीत, हे पाहून औरंगजेबाने महाराजांवरील पहारे कडक केले. रामसिंहावर पुढे वाईट प्रसंग येऊ नये, म्हणून शिवाजी महाराजांनी रामसिंहाची जामीनकी रद्द करविली आणि सोबतची बरीच माणसे दक्षिणेस परत पाठविण्याची परवानगी मागितली. याच सुमारास महाराजांना शहरातील दुसऱ्या एका हवेलीत हलविण्याचा बेत आखण्यात आला. तत्पूर्वीच निघून जाण्याचे महाराजांनी ठरविले.
१७ ऑगस्ट १६६६ रोजी संध्याकाळी शिवाजी महाराज पेटाऱ्यातून निसटले. महाराज कैदेतून पळून गेल्याचे पहारेकऱ्यांना दुसऱ्यां दिवशी समजले. औरंगजेबाला ही बातमी ताबडतोब कळविण्यात आली. रामसिंह, फौलादखान, तरबियतखान इत्यादींना तपासासाठी कडक आज्ञा देण्यात आल्या. आग्ऱ्यात अनेक लोकांची धरपकड करण्यात आली. औरंगजेबाचा मोठा संशय रामसिंहावर होता; पण आरोप सिध्द झाला नाही. औरंगजेबाने अधिकाऱ्यांना काही शिक्षा केली नाही. पुढे शिवाजी महाराज सुरक्षितपणे राजगडला पोहोचले. (२० नोव्हेंबर १६६६). नंतर काही महिन्यांनी संभाजींना राजगडाला सुरक्षितपणे आणण्यात आले.
पोहोचल्यानंतर त्यांनी या गोष्टीचा फार गवगवा केला नाही. उलट वरकरणी आपण मोगलांशी एकनिष्ठ आहोत, असे दाखविले व बादशहाचा निरोपही घेता आला नाही, अशी दिलगिरी व्यक्त केली. शिवाजी महाराजांचा आपल्या मुलाला उपसर्ग होऊ नये, यासाठी औरंगजेबानेही सबुरीचे धोरण ठेवले. राजगडास पोहोचल्यानंतर महाराजांनी शहाजादा मुअज्जम यास पत्र लिहून संभाजीला दिलेली मनसब व जहागीर मिळावी, म्हणजे आपण त्याच्याबरोबर पथके देऊन सुभेदाराच्या चाकरीसाठी त्याला औरंगाबादेस पाठवू असे कळविले आणि सरदारांसहित संभाजी औरंगाबादेस गेले. तिथे संभाजी काही दिवस राहिले व पथके आणि सरदार यांना औरंगाबादेस ठेवून राजगडास परतले. त्यांना मनसब व जहागीर आणि शिवाजी महाराजांना ‘राजा’ ही पदवी या घटना १६६७ मधील होत.
महाराष्ट्रात परतल्यानंतरच्या हालचाली
महाराजांच्या आग्रा भेटीचा फायदा घेऊन आदिलशहाने कोकणात पुन्हा आक्रमण केले. शिवाजी महाराजांनी फोंडा किल्ला आणि इतर काही महाल वगळता मध्य व दक्षिण कोकण हे प्रदेश पुन्हा ताब्यात घेतले आणि सावंतवाडीच्या बंडखोर देसायांना आपल्या हवाली करावे, असे पोर्तुगीजांना सांगितले. पोर्तुगीजांच्या गोव्याच्या मुलखातील बारदेशावर तीन दिवस स्वारी केली (१० ते १२ नोव्हेंबर १६६७). पेडणे, कुडाळ, डिचोली इ. भागांतील बंडखोर देसायांना पकडावे, असा त्यांचा उद्देश होता; पण ते लोक गोव्याला पळून गेले. या स्वारीत पोर्तुगीजांचे नुकसान व मनुष्यहानी झाली. अखेर थोड्या दिवसांनी १६६७ मध्ये दोन्ही पक्षांत तह झाला. तहाप्रमाणे मराठ्यांनी कैदी आणि मालमत्ता परत केली. पोर्तुगीजांनीही बंडखोर देसायांना आवर घालू अशी हमी दिली. दाभोळला पोर्तुगीजांना वखार उघडण्यास शिवाजी महाराजांनी परवानगी दिली. याच वर्षी फ्रेंचांनाही राजापूर येथे वखार घालण्यास त्यांनी परवानगी दिली. सिद्दीचा निकाल लावण्यासाठी मराठ्यांनी एप्रिल १६६९ मध्ये जंजिऱ्याला वेढा दिला.
जंजिरा शिवाजी महाराजांच्या हाती जाणे मोगल, पोर्तुगीज आणि इंग्रज यांपैकी कुणालाच नको होते.
मोगल-मराठा संघर्ष
शिवाजी महाराजांनी मोगलांना दिलेले किल्ले परत घेण्यास सुरुवात केली. तानाजीने केलेला सिंहगडावरील अचानक हल्ला त्याच्या हौतात्म्यामुळे अविस्मरणीय ठरला (४ फेब्रुवारी १६७०). या लढाईत तानाजी आणि राजपूत किल्लेदार उदेभान हे दोघेही ठार झाले.
कोकणात या सुमारास शिवाजी महाराजांनी राजगडहून राजधानी रायगडला हलविली (१६७०). पुढील अल्पकाळातच मराठ्यांनी त्र्यंबकेश्वर, खळा, जवळा, औंढा, पट्टा इ. किल्ले जिंकून घेतले. ५ जानेवारी १६७१ रोजी मराठ्यांनी बागलाणातील साल्हेरचा मजबूत किल्लाही जिंकून घेतला. मराठ्यांच्या दुसऱ्या सैन्याने औसा, निलंगा, नांदेड, उमरखेड इ. भागांत धुमाकूळ घालून बऱ्हाणपूर लुटले.
इंग्रजांनी सिद्दी आणि महाराज यांत मध्यस्थी करण्याच प्रयत्न केला; परंतु सिद्दी आरमाराला इंग्रज मुंबईत आश्रय देतात, या सबबीवर ही मध्यस्थी शिवाजी महाराजांनी झिडकारली. इंग्रजांची मुख्य गाऱ्हाणी म्हणजे राजापूर आणि इतर स्थळांतील वखारींच्या लुटीबद्दल भरपाई मागण्यासंबंधी होती. मराठ्यांच्या हाती जंजिरा पडू नये, ही इंग्रजांची इच्छा असूनही, व्यापार-उदीम, जकात आणि मुक्त संचार यांसाठी मराठ्यांशी मिळते घेण्याचे धोरण त्यांना स्वीकारावे लागले. अखेर वाटाघाटी होऊन इंग्रज आणि महाराज यांच्यात तह करण्याचे ठरले (१६७४).
राज्याभिषेक
मोगलांचे प्रभावी सैन्य उत्तरेत गुंतले आहे आणि दक्षिणेत त्यांचा कोणीच मातब्बर सेनापती नाही, शिवाय विजापूरही हतबल अवस्थेत आहे, ही संधी साधून शिवाजी महाराजांनी राज्याभिषेकाचा घाट घातला आणि लवकरच राज्याभिषेकाचा अपूर्व सोहळा रायगडावर संपन्न झाला.
राज्याभिषेक वैदिक संस्कारांनीच संपन्न व्हावा, असे गागाभट्टादी विद्वानांनी ठरविले. राज्याभिषेक समारंभाचे तपशील समकालीन कागदपत्रांवरून उपलब्ध झाले आहेत. २९ मे १६७४ रोजी महाराजांचे उपनयन, तुलादान आणि तुलापुरुषदान हे समारंभ पार पडले. ३० मे १६७४ रोजी पत्नींशी वैदिक पध्दतीने पुन्हा विवाह करण्यात आले. पुढील सहा दिवस विविध समारंभ होत होते. ६ जून १६७४ ज्येष्ठ शुध्द द्वादशी, शुक्रवारी, शके १५७६, शिवाजी महाराजांनी राजसिंहासनावर बसून छत्रचामरे धारण केली. स्वराज्यातील सर्व किल्ल्यांवरही समारंभ झाले.
तोफांना सरबत्ती देण्यात आल्या. राज्याभिषेकापूर्वी महाराजांनी भवानी देवीला अनेक वस्तूंबरोबर सोन्याचे एक छत्र अर्पण केले. प्रतापगडावर दानधर्माचा मोठा सोहळा झाला. या प्रसंगी शिवाजी महाराजांनी ‘क्षत्रियकुलावतंस’ व ‘छत्रपती’ अशी दोन बिरुदे धारण केली. राज्याभिषेकाच्या नंतर १२ जून १६७४ रोजी इंग्रज आणि महाराज यांत तह झाला. तहाच्या अटीप्रमाणे इंग्रज हे मराठी राज्यात वखारी काढणे, व्यापार करणे इ. व्यवहार मोकळेपणाने करू लागले. मराठी राज्यात आपले नाणे चालावे किंवा मोगल राज्यातील वखारींच्या लुटीची भरपाई मराठ्यांनी करून द्यावी, अशा अवास्तव मागण्या शिवाजी महाराजांनी नाकारल्या.
राज्याभिषेकानंतर जिजाबाईंचा मृत्यु झाला (१७ जून १६७४). याशिवाय काही आकस्मिक मोडतोडीच्या घटना रायगडावर घडल्या. तेव्हा निश्चलपुरी या मांत्रिकाने पुन्हा एक अभिषेक करण्याचा सल्ला दिला व तो तांत्रिक अभिषेक शिवाजी महाराजांनी केला.
राज्याभिषेकानंतरच्या मोहिमा
राज्याभिषेक समारंभानंतर शिवाजी महाराजांनी पुन्हा वऱ्हाड, खानदेश या मोगल इलाख्यात चढाया केल्या (१६७४-७५). महाराजांनी जंजिऱ्याचे सिद्दी आणि मुंबईकर इंग्रज यांवर दडपण आणले आणि कारवारकडचा विजापूरच्या आधिपत्याखालील प्रदेश घेण्याची योजना आखली.
दक्षिण मोहीम
तमिळनाडूमध्ये विजापूरच्या अधिकाऱ्यांत दोन तट होते. खवासखान याच्या पक्षाचा नासिर मुहम्मद हा जिंजीचा किल्लेदार होता आणि बहलोलखानाचा नातेवाईक शेरखान हा दक्षिण तमिळनाडूचा प्रशासक होता. तमिळनाडूमधील मांडलिक राजे विशेषतः तंजावर व त्रिचनापल्ली येथील राजे हे कधी शेरखानाला, तर कधी नासिर मुहम्मदला मदत करून आपला बचाव करून घेत होते. तंजावर दरबारातील मुत्सद्दी रघुनाथ नारायण हणमंते याने व्यंकोजी राजांना (शिवाजी महाराजांचे सावत्र बंधू) समजावून सांगितले की, विजापूर दुर्बल झाले आहे व तमिळनाडूमधील विजापूरचे प्रशासक हे आपसांत भांडत आहेत. तेव्हा ही संधी साधून तमिळनाडूमधील विजापूरची सत्ता नाहीशी करावी; पण व्यंकोजी राजांना हा सल्ला मानण्याचे धैर्य झाले नाही. तेव्हा त्यांना सोडून रघुनाथ नारायण हा हैदराबादवरून साताऱ्यास आला. हैदराबादेस आक्कण्णा आणि मादण्णा या दोन बंधूंची सत्ता होती.
महाराजांना त्यांचे भरपूर साहाय्य मिळेल, असे रघुनाथ नारायण याने सुचविले. गोवळकोंड्याचा सुलतान अब्दुल्लाह २१ एप्रिल १६७२ रोजी मरण पावला. त्यानंतर त्याचा जावई अबुल-हसन तानशाहा गादीवर आला. महाराजांनी त्याच्याशी स्नेहसंबंध जोडले होते. पुढे आक्कण्णा व मादण्णा या दोन बंधूंनी गोवळकोंड्याचे राजकारण केले. शिवाजी महाराजांनी त्यांच्याशी निकटचे संबंध जोडले. यातूनच महाराजांनी दक्षिण दिग्विजयाची मसलत तडीस नेली.
दक्षिणेकडे रवाना होण्यास योग्य मार्ग हैदराबाद, कुर्नूल, तिरुपती, मद्रास व जिंजी हाच होता. दुसरा मार्ग बेळगाव, धारवाड हे जिल्हे व तुंगभद्रेच्या दक्षिणेकडील चित्रदुर्ग, कोलार, आंबोण, वेल्लोर, जिंजी हा होता. शिवाजी महाराजांनी हैदराबादमार्गे जाण्याचा निर्णय घेतला. गोवळकोंड्याचे प्रधान आक्कण्णा व मादण्णा हे अनुकूल होते. बहादुरखान मराठ्यांच्या मोहिमेला अनुकूल बनला. महाराजांनी आपल्या गैरहजेरीत राज्यकारभार व्यवस्थित चालावा, म्हणून रायगडावर प्रमुख मंत्री तसेच धाकटा मुलगा राजाराम आणि पत्नी सोयराबाई यांना ठेवले आणि संभाजींस शृंगारपूर येथे राहण्यास आज्ञा केली. दक्षिण दिग्विजयासाठी त्यांनी रायगड सोडला (१६७६). त्यांच्या अनुपस्थितीत मोरोपंतांची जंजिऱ्यावरील मोहीम, रामनगर प्रकरणात पोर्तुगीजांकडून चौथाईची मागणी, अशी काही प्रकरणे उद्भवली.
शिवाजी महाराज मजल दरमजल करीत हैदराबादच्या सरहद्दीवर पोहोचले. मराठ्यांच्या सैन्याची एक तुकडी बेळगाव, धारवाड या भागांत विजापूरविरुध्द लढण्यात गुंतली होती. ती नंतर महाराजांच्या सैन्यात सामील झाली. महाराज मार्च १६७७ च्या प्रारंभी हैदराबादला पोहोचले. तिथे त्यांचे भव्य स्वागत झाले. मोगलांना प्रतिकार करण्यासाठी मराठ्यांची आपल्याला मदत आसावी, अशी कुत्बशाहाची इच्छा होती. तमिळनाडूतून विजापूरची सत्ता सर्वस्वी नाहीशी करावी, ही मराठ्यांची इच्छा होती. कुत्बशाहाशी मैत्री केल्यास मोगलांविरोधी दक्षिणेत आघाडी उघडता येईल, असाही एक महाराजांचा हेतू होता. व्यंकोजीराजे यांनी तंजावरला राज्य स्थापिले होते. बंगलोर-जिंजीचा प्रदेश आणि तंजावर हे भाग शहाजींच्या नंतर त्यानी आपल्याकडे ठेवले. त्यांत आपल्याला वाटा मिळाला पाहिजे, असा दावा महाराजांनी केला; तथापि विजापूरची सत्ता नामशेष करणे, हाच त्यांचा प्रमुख उद्देश होता.
हैदराबादला महाराज एक महिना राहिले. कुत्बशाहाशी वाटाघाटी होऊन मैत्रीचा तह झाला. त्यात मोहीम चालू असेपर्यंत स्वारी खर्चासाठी म्हणून कुत्बशाहाने रोजाना तीन हजार होन द्यावेत, तसेच महाराजांनी विजापूरकडून जिंकलेला प्रदेश त्यांची वडिलार्जित जहागीर वगळता त्यांनी कुत्बशाहाकडे द्यावा, असे ठरले. नंतर पंधरा ते वीस हजार घोडेस्वार आणि तीस हजार पायदळ घेऊन महाराज श्रीशैलम पर्वतावर गेले (एप्रिल १६७७). तेथून कालहस्ती, तिरुपती इ. क्षेत्रे करीत ते मद्रासच्या जवळ पेद्दपोलम गावी पोहोचले (मे १६७७). तेथून ते जिंजीच्या भव्य दुर्गाकडे आले. जिंजीचा किल्ला त्यांच्या ताब्यात आला (मे १६७७). वेल्लोरचा किल्ला मराठ्यांनी जिंकून घेतला (२२ जुलै १६७८). महाराजांनी जिंजी प्रदेशाची मुलकी आणि बिनमुलकी व्यवस्था बारकाईने केली आणि किल्ल्याची डागडुजी केली.
महाराष्ट्रातून त्यांच्याबरोबर आलेले शेकडो कारकून, मुलकी अधिकारी कामावर तैनात करण्यात आले. हा हा म्हणता विजापूरचा कारभार नाहीसा झाला. त्रिवाडी येथे तमिळनाडूच्या आदिलशाहातील मुलखाचा सुभेदार शेरखान याचा मराठ्यांनी पराजय केला. विजापूरच्या अधिकाऱ्यांनी आपापली ठाणी सोडून पळ काढला. मराठ्यांनी वालदोर, तेगनापट्टण, पानेमोल, त्रिनेलोर इ. स्थळे ताब्यात घेतली. शेरखानाला कुठूनही मदत मिळण्याची आशा राहिली नाही. त्याने भुवनगिरीमध्ये आश्रय घेतला. मराठ्यांनी भुवनगिरीच्या किल्ल्याला वेढा घातला (जुलै १६७७). तेव्हा शेरखान शरण घेऊन त्याने किल्ला मराठ्यांच्या हवाली केला, तसेच तह करून बाकीच्या अटीही त्याला मान्य कराव्या लागल्या.
पुढे महाराज कावेरीच्या तीरावर पोहोचले. तिरुमलवाडी येथे त्यांनी छावणी घातली. याच ठिकाणी मदुरादी राज्यांचे राजे आणि नायक यांनी मराठ्यांना खंडणी पाठविली. व्यंकोजीराजे यांनीही महाराजांची भेट घेतली. शिवाजी महाराजांनी वडिलार्जित मालमत्ता, प्रदेश यांमध्ये आपल्याला अर्धा वाटा मिळावयास हवा, असे व्यंकोजीस सांगितले. तेव्हा व्यंकोजीराजे अचानक तंजावरला गुपचूपणे निघून गेले. शिवाजी महाराजांनी कावेरीच्या उत्तरेकडील व्यंकोजीचा प्रदेश घेतला. त्यावेळी व्यंकोजींनी सबुरीचे धोरण अंगीकारून समझोता केला. म्हैसूर भागातील मराठा प्रदेशाची व्यवस्था करून बंगलोर वगैरे काही परगणे त्यांनी व्यंकोजीची बायको दिपाबाई हिच्यासाठी परत केले.
म्हैसूरच्या सीमाभागात त्यांच्यात आणि म्हैसूरकरांत किरकोळ चकमकी झालेल्या दिसतात; पण ते प्रकरण वाढले नाही. दक्षिणेत व्यंकोजीराजांनी महाराजांच्या सैन्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला; पण १६ नोव्हेंबर १६७७ च्या लढाईत त्यांचा पराजय झाला व त्यांना जबर रकमेची भरपाई करावी लागली. रघुनाथराव हणमंतेसारख्या वाकबगार अधिकाऱ्याच्या हाती महाराजांनी तमिळनाडू प्रदेशातील प्रशासनव्यवस्था सुपूर्त केली. बहादुरखानाने त्यांचा मार्ग मोकळा करून दिला, ती त्याची घोडचूक होती. औरंगजेबाने बहादुरखानाच्या हातून सूत्रे काढून घेतली.
म्हैसूरहून परतताना मराठ्यांनी कोप्पळ, गदग, लक्ष्मेश्वर इ. स्थळांवरून प्रवासघ केला. कर्नाटकात शिवाजी महाराजांचा तीन महिने मुक्काम होता. शिवाजी महाराजांच्या परतीच्या वाटेवर बेळगावच्या आग्नेयीस सु. ४८ किमी. वरील बेलवडी येथील देसाईण सावित्रीबाई हिने शिवाजी महाराजांच्या लष्करास सु. सत्तावीस दिवस कडवा प्रतिकार केला. अखेर अन्नधान्याचा तुटवडा पडल्यानंतर सावित्रीबाई महाराजांच्या सैन्यावर तुटून पडली आणि तिने पराक्रम गाजवून लष्कराची हानी केली; पण अखेर मराठ्यांनी तिची गढी घेतली. देसाईणीला तिच्या उपजीविकेसाठी काही प्रदेश देण्यात आला. दक्षिण दिग्विजय आटोपून महाराज एप्रिल १६७८ मध्ये पन्हाळागडास परत आले.
शिवाजी महाराजांनी वतनदारांचे हक्क नियंत्रित केले, त्यांना महसुलातून (रयतेकडून) हिस्सा मिळत असे. त्याऐवजी रोख रक्कम वेतन म्हणून ठरवून दिली, त्यांना गढ्याकोट बांधण्यास मनाई केली. तसेच लष्कराला नियमित वेतन देण्याची पद्धत सुरू केली. तलवारीच्या जोरावर राज्य निर्मिले व तलवारीच्या जोरावरच ते रक्षिले; तथापि ‘साहेबी कारकुनाची’ अशी घोषणा केली. याचा अर्थ नागरी प्रशासन लष्करापेक्षा सर्वोच्च असेल. गड–कोटांना काय हवे ते कारकून देतील. कारकून प्रजेकडून कर वसूल करतील. तो लष्कराला हक्क नाही, अशा शिवाजी महाराजांच्या आज्ञा असत. कारभार ठीक चालवायचा असेल, तर मुलकी सत्ता ही लष्करी सत्तेहून श्रेष्ठ असली पाहिजे. मध्ययुगात मुलकी सत्तेचे श्रेष्ठत्व सांगणारा हा थोर नेता भारताच्या इतिहासातही कदाचित एकमेव असेल.
स्वराज्यस्थापनेत डोंगरी किल्ले, सवेतन सुसज्ज सेना आणि विश्वासू सहकारी यांचा वाटा मोठा होता. स्वाऱ्यांचा हेतू राज्यविस्ताराबरोबर लूट मिळविणे आणि संपत्ती व दारुगोळा जमा करून खजिना सुसज्ज ठेवणे, हा होता. या राज्यांगाकडे शिवाजी महाराजांनी विशेष लक्ष पुरविले. त्यामुळे सैन्याचा पगार कधी तटला नाही वा मागे पडू दिला नाही. किल्ले, दारुगोळा, धान्य, गलबते यांचा खर्च त्यांच्या या कोषबलावर अवलंबून होता. अपुरी शस्त्रास्त्रे, मर्यादित सैन्य व साधनसंपत्ती यांमुळे आमनेसामने अशी मैदानी युद्धपद्धती मोगल वा विजापूर यांसारख्या बलाढ्य शत्रूंसमोर निरुपयोगी ठरेल. एवढेच नव्हे तर ते हानिकारक ठरेल, हे जाणून त्यांनी आपल्या युद्धपद्धतीला गनिमी युद्धतंत्राची जोड दिली.
आपल्या प्रशासन–लष्कर व्यवस्थेत शिवाजी महाराजांनी धार्मिक बाबींना कधी आड येऊ दिले नाही. या काळात सर्वधर्मसहिष्णू राज्यपद्धती स्थापणे, हे एक प्रकारचे क्रांतिकार्य होते.
शिवाजी महाराजांची हेरव्यवस्था उत्तम असली पाहिजे हे त्यांच्या अनेक मोहिमा, अनपेक्षित यशस्वी हालचालींवरून लक्षात येते. आपल्या राज्याच्या उत्पन्नाचा एक मोठा वाटा ते हेरव्यवस्थेवर खर्च करत असत. अशा प्रकारचे उल्लेख युरोपीय पत्रव्यवहारांत सापडतात.
शिवाजी हे एक विलक्षण व्यक्तिमत्त्व होते. ते अजिंक्य असा लढवय्या पुरुष होते. राज्यकारभाराची कला त्यांना पूर्ण अवगत होती. त्यांनी आपले बेत उत्तम रीत्या आखून ते शहाणपणाने व धीमेपणाने कृतीत उतरविले. कोणत्याही मोहिमेस वा कार्यास हात घालताना ते अनेकांचा सल्ला घेत व नंतरच आपल्या योजनेस पटेल तेच स्वीकारत. सर्व कार्यात त्यांनी सर्व जातींतील गुणी माणसे सामावून घेऊन त्यांच्याकडून ती ती कामे करवून घेतली.
पतितपरावर्तन हा मार्गही त्यांनी अवलंबिला. बजाजी निंबाळकर व नेताजी पालकर हे सुंता झालेले आणि मुसलमानांत दहापाच वर्षे राहिलेले मराठे सरदार त्यांनी परत हिंदू करविले व त्यांच्या कुटुंबियांशी सोयरीक केली. तसेच सर्व धर्मांतील साधु-संतांना सन्मानाने वागविले आणि त्यांना उदार अंतःकरणाने देणग्या दिल्या. मुंबई–लंडन येथील इंग्रजांच्या पत्रव्यवहारात (१६ जानेवारी व १४ फेब्रुवारी १६७८) अलेक्झांडर द ग्रेट, सीझर आणि हॅनिबल या पराक्रमी शूर वीरांबरोबर शिवाजी महाराजांची तुलना करण्यात आली आहे. मार्तिन या प्रवाशाने आपल्या रोजनिशीत शिवाजी महाराजांच्या धूर्तपणाबद्दल कौतुक केले आहे.
खाफीखान हा औरंगजेबाचा तत्कालीन इतिवृत्तकार. तो शिवाजी महाराजांचा कट्टर द्वेष्टा होता; पण तोही शिवछत्रपतींविषयी म्हणतो, ‘शिवाजीने सार्वकाल स्वराज्यातील प्रजेचा मान राखण्याचा प्रयत्न केला. लज्जास्पद कृत्यापासून तो सदैव अलिप्त राहिला. मुसलमान स्त्रियांच्या अब्रूला तो दक्षपणे जपत असे. मुसलमान मुलांचेही त्याने रक्षण केले. या बाबतीत त्याच्या आज्ञा कडक असत.
जो कोणी या बाबतीत आज्ञाभंग करील, त्याला तो कडक शासन करीत असे.’ महाराष्ट्रेतर कवींनी–विशेषतः तमीळ (सुब्रह्मण्य भारती), तेलुगू (कोमाराजू वेंकटलक्ष्मणराव), बंगाली (रवींद्रनाथ टागोर), गुजराती (झवेरचंद मेघाणी) हिंदी (केदारनाथ मिश्र) इत्यादींनी महाराजांना गौरविले आहे. स्त्रियांचा आदर, परधर्माबद्दल सहिष्णुता आणि स्वधर्माबद्दल जाज्ज्वल्य अभिमान यांमुळे लोककल्याणार्थ राजा ही उपाधी शिवाजी महाराजांना लाभली. त्यांचे जीवन भारतीय राष्ट्रीयत्वाचा आविष्कार होय. त्यांनी बहुविध माणसे निर्माण केली आणि राष्ट्रीय परंपरा सुरक्षित राहील, अशी व्यवस्था केली. धैर्य आणि साहस यांबरोबरच अखंड सावधानता जोपासली आणि तेच त्यांच्या राजकारणाचे प्रमुख सूत्र होते. –
निश्चयाचा महामेरु, बहुत जनांसी आधारु
अखंड स्थितीचा निर्धारु, श्रीमंत योगी.
दक्ष प्रजापालन, न्याय्य करव्यवस्था, सैन्याने रयतेला त्रास न देणे, या व अशा अनेक यशस्वी धोरणांमुळे महाराजांच्या मृत्यूनंतरही भारतव्यापी झाले. मराठी मनाला ही प्रेरणा-ज्योत आजपर्यंत पुरली आहे व पुढेही पुरेल यांत शंका नाही. विवेक वार्ता च्या वतीने या महापुरुषाला विनम्र अभिवादन....
संपादक : श्री. प्रमोद काकडे +91 9595 85 75 10➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.